Wednesday, November 30, 2016

बहुरूपी आवळा .....


सध्या आवळ्याचा सीझन सुरु आहे, आणि ज्या एका अंगत-पंगत समूहाची मी फेसबुकवर मेम्बर आहे, त्या ग्रुप मध्ये आवळ्याच्या विविध पदार्थांबद्दल पोस्ट्स येत आहेत . आवळा सुपारी, आवळा लोणचे, मोरावळा, खारवलेला आवळा , वगैरे वगैरे .

हे सर्व वाचून आवळ्याबद्दल खरंच कौतुक वाटलं .  उत्कृष्ट पौष्टिक मूल्य तर आहेतच,  पण कितीतरी प्रकारनी  त्याच्यावर प्रक्रिया केल्या जाताताजातात आणि विवध पदार्थ बनतात .

इतके सर्व प्रकार बनवण्याचा माझा पिंड नाही; मला स्वतःला आवळा नुसताच मीठ लावून खायला आवडतो,  आणि मग त्यावर पाणी प्यायला आवडतं , कारण ते खूप मधुर लागतं ....

कविता करणं  कधी कधी जमतं ; अशीच ही  बहुरूपी आवळ्यावर  एक ......   

 

आवळ्यांचा सीझन सुरु झाला
कि अगदी एखादा सिनेमा बघितल्यासारखं वाटतं .

काही आवळे धुऊन पुसून अगदी
लगबगीने प्रेशर कुकर मध्ये जातात ,
आणि शिट्टयांच्या कल्लोळात
अचानक थोडे पारदर्शक होऊन बाहेर पडतात .
न शोभणाऱ्या बियाना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला जातो,
आणि आवळे भगिनी
जातीने लोणच्याला हजर असतात.

कधी कधी तिखट न सोसणाऱ्या ,
किंवा केवळ फॅशन म्हणून तसे दाखवणाऱ्या ,
एका बरणीत बसून मिठाच्या पाण्यात
जाऊन बसतात ,
आणि मधून मधून
परदेशातल्या बीचेस वर करतात
तसे सूर्यस्नान करतात .

अश्या प्रकृती जपणार्या आवळ्यांमध्ये
काही जुन्या विचाराचे ,
डायबिटीसचा विचार धुडकावणारे पण असतात ,
आणि मग ते
साखरेच्या सुंदर पाकात मुरून
मोरावळा बनतात,
आणि औषधी म्हणून इकडे तिकडे प्रसिद्ध होतात .

काही हरहुन्नरी आवळे ,
आले, हळद आणि आंबेहळद मंडळीत रमतात ,
आणि मोहरीच्या डाळीत , कधी कधी व्हिनेगर मध्ये
उर्वरित आयुष्य घालवतात .

अनेक देश सेवेला वाहून घेतलेले आवळे ,
आपले अख्खे आयुष्य ,
इतर चौसष्ट औषधी वनस्पतींबरोबर घलवून ,
च्यवनप्राश बनतात , आणि अमर होतात .

काही वेळा आवळे अगदी खेळकर असतात ,
आणि अगदी तुकडे तुकडे होऊन
मीठ, आणि लिंबाचा रस लोशन सारखा लावून
उन्हात बसतात .
मानवांसारखे आवळे जगात फेर आणि लव्हली नसतं ,
आणि कडक, काळपट पण चवीला ग्रेट
अशी आवळा तुकडा सुपारी बनते.

पण आवळे म्हटलं कि प्रकार आलेच.
काही तारुण्याने रसरसलेले प्रकार ,
सगळ्याचा अगदी कीस काढतात.
अमुक एक पद्धतीतच उन्हात बसायचं,
वेडे वाकडे तुकडे नाही,
वेळो वेळी लिंबाचा रस वगैरे चा रतिभ चालूच,
हळूच नाजूक हाताने वर खाली करवून घेणे,
आणि पूर्ण कोरडे वाळल्यावर
एका छानश्या काचेच्या बरणीत विराजमान होणे.

अर्थात सर्वसाधारण जनता स्टाईल आवळे पण असतात
आणि ते अगदी स्वखुशीने स्वतः
चटण्या , रसम , इत्यादी मध्ये
हिरीरीने भाग घेतात .

पण एक आवळा असा पण असतो,
कि छोट्याशा हातांमध्ये बसून ,
तिखट मिठाच्या ताटलीतल्या पुडेत
मधून मधून पडण्यात ,
आणि दुधाच्या दातांनी चावून घेण्यात
स्वतःला धंन्य समजतो,
आणि आंबट तुरट म्हणून
डोळे बारीक करून जेव्हा एखाद्याच्या ओठावर
हसू दिसतं ,
तेव्हा तर आवळा कृतकृत्य होतो....

No comments:

Post a Comment