आपल्याकडे जुन्या वस्तू टाकून, सोसासोसाने नवीन उपकरण घेण्याची पद्धत रूढ झाली आहे . ब्लेंडर, फूड प्रोसेसर वगैरे याचा खूपच वापर आपल्याकडे मोठ्या शहरातून होतो. जस, "मला पाट्यावर वाटता येत नाही ", तसच, "मला काठीने तारेवर कपडे वाळत टाकता येत नाहीत " असे पदोपदी ऐकण्यात येतं .
अश्या वेळी , मेलबोर्न मधली माझी मैत्रीण सौ. शुभदा गोखले , तिचे जितके कौतुक करावे तितके थोडेच ! एक मोठे जातं , एक छोटं , दोन खलबत्ते, एक पाटावरवंटा , ह्या गोष्टींचा नियमित वापर असतो. सोबत विजेची उपकरणे असतात , तरी पण पाट्यावर वाटलेली चटणी , डाळ , आणि रवीने घुसळलेलं ताक, वेगळंच !
माझ्या माहितीप्रमाणे इंग्लंड मधली माझी मैत्रीण , सौ प्रीती देव यांच्या कडे ही अशीच उपकरणे आहेत . (त्यांच्या कडे कोळश्याची जुन्या पद्धतीची शेगडी पण आहे )
एका मेलबोरनी सकाळी मागील दारी बसलेल्या ह्या मंडळींसाठी हि कविता ...
सगळे दगड दगड जमले
कि एखाद्या गावचे
सगळे लोक जमल्यासारखं वाटतं .
मागील दारी कट्ट्यावरची फरशी ,
आपल्या सख्यासहेल्यांना घट्ट धरून,
पिढ्या पिढयांचे ओझं पेलवत ,
आणि तरीही काहीही कुरकुर ना करता गप्प ...
एखाद्या द्वाड मुलासारखे दोन्ही खलबत्ते ,
इतके सुदृढ
कि त्यांना बत्त्यांनी ठोकलं ,
तरी खाली पोतं ठेऊन ठोकावे लागतं ,
नाहीतर फारशी तुटते;
आयुष्यभर दणके खात ,
स्वतः मसाले, लसूण चटण्या , दाण्याच्या चटण्या
यांच्याशी चकाट्या पिटत वेळ घालवणे
हे परम ध्येय.
ह्या उलट पाटा .
सौंदर्य वैगैरे चेहर्यावर नसतं ,
आपल्या कर्मात असतं , अश्या ठाम मताचा.
चेहर्यावर जितके व्रण, तितकं काम उत्कृष्ट.
बरोबर वरवंटा.
एकीकडे बारश्यात सजून पाळण्याभोवती फिरणे,
तर इकडे रोज ,
पाट्यावर आरामात पहुडलेल्या
मिरच्या मीठ, कोथिंबीर, खोबरं प्रभूतींना
ओंजारून गोंजारून
निवडणुकीत हरवल्यासारखे चिरडणे.
कधीतरी डाळी आणि कैर्या लोकं
पण अनुभव घायला येतात.
दळून पूड कशी करावी ,
ह्याचा आदर्श म्हणजे जातं .
दोन गोलाकार दगडांमध्ये थोडे थोडे धान्य टाकून,
मैत्रिणीबरोबर दांडा धरून ,
फिरवलेला वरचा दगड ,
वेळीप्रसंगी दगडाच्या डोळ्यातही ऐकून पाणी येईल
आणि ते पुसायला फिरणे थांबेल,
अश्या गायलेल्या सुंदर ओव्या,
आणि ऐकत ऐकत एका मऊ जुन्या साडीवर
खाली कौतुकाने पडणारे पीठ .
एका सुंदर सकाळी ,
नरकचतुर्दशीच्या दिवशी लौकर अंघोळी करून
जणू सकाळ्ळच्या उन्हात जणू
बसलेली ही सर्व मंडळी.
उलट्या ऋतूंच्या देशात असली म्हणून काय झालं?
एकत्र जमली कि तोच दसरा आणि तीच दिवाळी ....