Sunday, November 26, 2017

आंतरराष्ट्रीय पोळपाट लाटणे ("the best PolpaT-LaatNe in the universe "-D.J Trump)


माझी फेसबुक वरील , मला कधी  न भेटलेली मैत्रीण , विशाखा पर्वते .   अमेरिकेत राहते .  आम्ही दोघी अंगत पंगत ह्या फेसबुक वरील ग्रुप च्या सभासद आहोत .

विशाखाने नुकतेच  एका  पोळपाट लाटण्याचा फोटो पोस्ट केला .   तुम्ही म्हणाल, "त्यात काय मोठं ?"  मोठं हे, की कॅलिफोर्नियातील रेडवूड  लाकडापासून हे पोळपाट ,  अमेरिकन  ,  IT मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मित्राने स्वतःच्या हाताने बनवले, आणि त्यांना भेट दिले.

तुम्ही म्हणाल , लाटण्याचे काय ? तर लाटणे , हे तर विशाखाच्या  कोकणातल्या पणजोबानी  फणसाच्या लाकडापासून आपल्या सौभाग्यवतींसाठी बनवले.  पिढीजात लाटणे.

असे हे पोळपाट-लाटणे वापरून पोळ्या /फुलके इत्यादी करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकाराचे चालते -बोलते-लाटते उदाहरण .  शतकापूर्वीच्या लाकडाचे पोळपाट , आणि शतकापूर्वीचे लाटणे .

मी फेसबुकवर आल्यापासून माझे DP , म्हणजे "उडणारी लाटणेवाली बाई"  कधीही बदलले नाही. आता मी ह्यावर कविता नाही करायची तर कोणी ?


फोटो सौजन्य : विशाखा पर्वते
  उत्तुंग रेडवूडचे रान,
अनेक शतके वसुंधरेने सांभाळलेले वृक्ष,
आणि वय झाल्यामुळे कधीतरी

एखाद्या वृक्षाची मालवलेली प्राणज्योत.

वसुंधरेंच्याच कुशीवरचे ते अचेतन लाकूड ,
कुणा एका आयटीवाल्याने
आपल्या कुशलतेने
मशीनवर ,रांधून, घासून, टोके मारून ,
गोल कापून , आणि कडा
गुळगुळीत करून
​बनवलेला पोळपाट,
आपल्या न दिसणार्या जखमा सहन करत
स्वयंपाकघरात ओट्यावर विचाराधीन आणि काळजीत .

ओट्याच्या खाली कप्य्यात अचानक ऐकू आलेली खडखड ,
विशाखाताईंनी कप्पा उघडून शोधलेले
गडबडीने कारण ,
आणि
एका ​अदृश्य प्रेरणेने बाहेर आलेले
एक लाटणं .

शतक लोटले ,
तरी एक लाकूडच दुसर्या लाकडाचे मन
समजू शकतं .
कोकणातली वाडी ,
तिथल्या आमराई , सुपारी आणि फणसाच्या बागा
आणि खूप पूर्वी अश्याच एका फणसाने
स्वतःची रजोनिवृत्ती समजताच
कामासाठी दिलेलं आपलं लाकूड .
कुणा एका हौशी पणजोबांनी
कौतुकाने पणजीबाईंसाठी बनवलेले
सुंदर लाटणे.

पोळपाट आणि लाटणे भेटणे ,
लाटण्यानें हळुवार पोळपाटावर फिरणे ,
जणू काही अदृश्य जखमांवर
सहानुभूतीचे मलम लावणे.

पोळपाट नव्या उमेदीने तयार ,
आणि एक दिवशी
फुलका लाटता लाटता
कुठंतरी विशाखाला कोणीतरी
पाठीवर कौतुकाची थाप मारल्याचा भास होणे.

फुलका लाटला ,
तव्यावर पडला , आत्मविश्वासाने फुलला .

दूर कुठेतरी एक कोकणातले पणजोबा ,
रेडवूड रानातील एका रेडवूडजोबांच्या
खांद्यावर अदृश्य हात ठेऊन म्हणाले ,
"Wonderful, isn't it !"
आणि रेडवूड आणखीनच ताठ मानेने उभा राहिला,
आणि म्हणाला ,
"आपल्यासारखं , न भांडता , एकत्र काम करायला
सर्व शिकले ,
तर हे जग किती सुंदर होईल , ना ?".....


1 comment:

  1. very informative post American state|on behalf of me} as i'm perpetually craving for new content that may facilitate me and my data grow higher.

    ReplyDelete