लहानपणापासून सफरचंद खात आले. चवी माहित असायच्या , नावे नाही . मग मोठं झाल्यावर , अनेक देश पहिले, विवध प्रकारची सफरचंदे बाजारात दिसू लागली, जाहिराती दिसू लागल्या , आणि ज्यांना आम्ही हिरवी सफरचंद म्हणायचो त्यांना ग्रॅनी स्मिथ सफरचंद म्हणतात हे समजलं .
मी ज्या फेसबुक वरील "अंगत पंगत" ग्रुप ची सभासद आहे, तिथे अनेकांनी आजपर्यंत ह्या सफरचंदाच्या चटण्या, व लोणची प्रसिद्ध केली आणि फोटो टाकले . इडली डोसाबरोबर दिले आणि कोणालाही कळले नाही .
अजून मी बनवली नाही. कारण फळ खायचीच खूप हौस आहे . पण ग्रॅनी स्मिथ बद्दल खूप आदर व कौतुक वाटलं .
आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका ग्रॅनी वर कविता झाली .
पण लक्षात राहायची तिची
आयुष्यातील आंबट गोड अनुभवातून
निरंतर कौतुकपात्र हिरवी तरुणाई .
काही रवाळ , लालबुंद ,
विविध आकाराचे नातेवाईक ,
आपापसात घोळक्यात कुजबुजत ;
मोठ्यामोठ्या देशांची नावे लावत
घरोघरी करंड्यात ;
काहींना आतून कोरून, लोणी साखर घालून
ओव्हन मध्ये राहून आलेले तेज ,
काहींना चक्क चुरा करून साखरेत पेरलेले ,
आणि अश्रू पात झाला कि सॉसा सॉसाने बाटलीत ;
काही पिळून , त्यांचा रस काढून ,
त्यांच्या सालांपासून दूर ...
पण ग्रॅनी आपल्या वया प्रमाणे वागते.
लहानपणी कोणाकोणाच्या ब्राऊन पेपर पिशवीतून
शाळा कॉलेजात ;
शेजारी एखादे भारदस्त सँडविच .
कधी टी. व्ही . बघता बघता आपणहून,
तुकडे न होता हातात आत्मसमर्पण ;
कधी तरी शूर वीरासारखे , हॉस्पिटलमध्ये,
एखाद्या प्लेटमधून तिच्या फोडिंनी
डॉक्टरकडे टाकलेला विजयी कटाक्ष ...
पण शेवटी ,
जगावे परी लोणचे रुपी उरावे
हे लक्षात घेऊन
आपले असंख्य तुकडे करून,
लोणचे मसाल्यात , लिंबू रसात , तेलात ,
ठरवून घालवलेला वानप्रस्थाश्रम,
आणि पोळ्या, भाकर्या ब्रेड लोकांचे
मिळालेले आशीर्वाद .
आपल्याकडे सद्ध्या "ग्रीन " च खूप कौतुक करतात ,
नियम करतात , लेक्चर देतात.
पण ग्रॅनी जन्मतःच सर्व शिकून आली ,
आणि तिला कोणी कुठेही बोलवत नाही ...
ती करून दाखवते. बोलत नाही .