Monday, March 7, 2016

शेंगदाणायन.....


महाशिवरात्रीचा उपास , आणि तयारी एक दोन दिवस आधी सुरु होते .  माझी फेस्बुकीय मैत्रीण प्रीती देव , हिने दाणे  भाजता भाजता काढलेला फोटो पोस्ट केला , आणि आजकालच्या आधुनिक जगात दाणे  भाजण्याचे कुठले तंत्रज्ञान  लोकप्रिय  आहे  याचा आढावा घेणार प्रश्न  विचारला  ….

वाळूत भाजलेले, भट्टीत भाजलेले ,  कढईत  चटके खात , डाग पडत पडत भाजलेले , आणि अगदी "इश्श्य ! मायक्रोवेव असताना  कढई कशाला ?  " म्हणत  फेर आणि लव्हली दिसणारे भाजलेले दाणे .

आणि मग आयुष्याचा शेवट  एखाद्या दाण्याच्या  कुटाच्या हात-यंत्रात , नाहीतर अगदी चुरा करणार्या मिक्सर मध्ये होतो , आणि उरते फक्त त्या दाण्यांची सुंदर चव ….

प्रीतीने  काढलेला  फ़ोटो :



  


गावरान शेंगाशयातून बाहेर पडलेल्या
वसुंधरेच्या लेकी ,
आणि वयात आल्यावर त्यांच्यावर झालेले संस्कार .

आपली नैसर्गिक मंद गुलाबी त्वचा ,
रंग रंगोटी च्या जगाच्या पद्धती ;

कधी समुद्राच्या वाळूत
एका मोठ्या कढईत,
आरामात उबदार होणे ,
आणि मधूनच स्वतःला झटकून बाहेर पडणे;
कधी एखाद्या भट्टीत
शौर्य गाजवून
युद्धाच्या खुणा दाखवत बाहेर पडणे ;
कधी एका पारंपारिक लोखंडी कढईत
विहार करत
घरातल्या गृहिणी कडे बघत
हट्टाने डावाशी दोन हात करणे ,
आणि मग कधीतरी
भाजक्या सुगंधात गुंग होउन
नकळत आयुष्यातल्या चकमकीची फळे
स्वतःवर लेउन
परातीत विश्रांती घेणे .

आजकाल
वसुंधरे च्या लेकीना जागतिकीकरण
समजलाय …

थोडा थोडा फेर आणि लव्हलीचा ही
असर पडलाय .

आधुनिक लेकी
मायक्रोवेव्ह फ़ेशिअल करतात ,
एका चीनी मातीच्या भांड्यात पडून राहतात ,
जास्त चौकश्या करणार्या
काचेच्या सटातून डोळे फाडून बघतात ,
आणि अगदी
डाग विरहित बाहेर पडतात .

आणि मग एकिकडे भिशीसाठी
जमलेल्या साबुदाणा काकू ,
वरे आजी, राताळेमाव्शी, काकडीताई
आणि शिङ्गाडाबेन
एकिमेकीकडे बघत म्हणतात ,
" काय आहे ,
आजकालच्या दाण्याना न ,
नवीन प्रयोग करायला आवडतात ;
पण कसं असतं ,
आम्ही साधी माणसं ;
मनात काय आहे ,
अथवा
आयुष्यातल्या अनुभवाचे रंग
तोंडावर जर दिसले
तर आमचा विश्वास वाढतो… "

आणि एकीकडे
एक आधुनिक कूल
निष्कलंक दाणाई
कोरेल च्या सटातून
एक जळजळीत कटाक्ष टाकते
आणि म्हणते ,
"इतकं सगळं फेर आणि लव्हली करून
शेवटी मिक्सर मध्ये
आयुष्याचा चुराडाच होणार ,
हे माहित न्हवतं …… "

No comments:

Post a Comment