Saturday, October 22, 2016

पोळीचा लाडू !



फेसबूक वर  "अंगत पंगत " नावाचा एक ग्रुप आहे .  त्यात महाराष्ट्राच्या स्वयंपाक व  सांस्कृतिक  परंपरांविषयी पोस्ट्स होत असतात . सणासुदीच्या आगमनानिमित्त  विवध फराळ पदार्थांची तर रेलचेल  असतेच , पण मग कधी कधी  उरलेल्या पोळ्यांमधून केलेला गूळ, खोबरं , तूप , वेलची, इ इ  घालून केलेला पोळीचा लाडू सगळ्यांना आपल्या लहानपणीच्या दिवसात घेऊन जातो, आणि कुठल्याही फराळाच्या लाडूंपेक्षा मधुरच लागतो. 

माझी मैत्रीण शर्वरी खटावकर , हिने उरलेल्या पोळ्यातून असेच स्वादिष्ट पोळीचे लाडू केले,   आणि त्यांचे एका सुंदर डिश मधले अतिशय मोहक असे पोर्ट्रेट  क्लिक करून फेसबुक वर पोस्ट केले .

मला  ६० वर्षांपूर्वी , पुण्याला सदाशिव पेठेतल्या शांताबाई गोखल्यांच्या बालकमंदिरात जाताना नेलेल्या काडीच्या डब्यातले पोळीचे लाडू आठवले.  आणि त्यांची चव हि क्षणभर रेंगाळली .  

आणि मग पोळीचे आयुष्य कसे असेल असे मनात आले. 

आणि कविता झाली ...... 

 

परातीत गेलेले बालपण ,
पिठी च्या संग घालवलेले क्षण,
लाटण्याच्या देखरेखीखाली मोठे होणे ,
आणि मग जणू काही परीक्षा :
आयुष्यातले चटके, आयुष्यातले फुलणे ,
आणि मग साजूक तुपाने
"उगी उगी , झालच हं !" म्हणत समजावणे .

​बर्गर पिझ्झा च्या योगात
तिचा वानप्रस्थाश्रम लवकर ,
आणि मग दिवसाच्या शेवटी
एका पोळीच्या डब्यात
किंवा कॅसरोल डब्यात
नशिबात काय येणार याचा विचार करत
स्वस्थ पडून राहणे.

मग एकाएकी ,
तुकडे होऊन मिक्सर मध्ये पडणे ,
तूप, गूळ, खोबरे मंडळींबरोबर हिंडणे फिरणे,
आणि गच्च मैत्रीत
लाडू म्हणून
शर्वरी आणि आजोबांच्या कौतुकात
उर्वरित आयुष्य अनुभवणे.

कसं असतं ,
लहानपणापासून शेवटपर्यंत
लहान थोरांच्या साठी आयुष्य वेचणारे
फार कमी दिसतात,
आणि पोळी तर तिच्या वानप्रस्थाश्रमात
स्वतःचे तुकडे तुकडे करून
सर्वांना आनंद देऊन
अमर होते .....

17 comments: