Friday, September 30, 2016

पेहचान कौन ?


 "अंगत-पंगत" ह्या फेसबुक वरच्या ग्रुप मधील माझ्या एका मैत्रिणीने , शुभदा थोरात , हिने  एक नवीन पदार्थ बनवला .  वयाने माझ्या वयाच्या (६०+)  आसपास , आणि त्यामुळे तळातळी,  चणा डाळ वगैरे पासून जरा दूर राहण्याचा प्रयत्न .  

 तिच्याच शब्दात ....:  
 
"खरं तर करायची होती ओली शेव. पण साठीनंतर नुसत्या चणाडाळीचे पदार्थ खायला घाबरते. शिवाय फक्त प्रथिनं मिळतील. म्हणून त्याला धान्याची जोड द्यायचं ठरवलं. बेसन आणि तांदूळपीठ यात हळद, तिखट, मीठ, ओवा, हिंग, जिरेपूड घालून इडलीपात्रात सोऱ्यातून शेव पाडून ती वाफवली. तिच्यावर थोडी इडली पोडी पसरवून साजूक तुपात राई, जिरं, कढीपत्ता याची फोडणी दिली. आता झालाय तो पदार्थ ओली शेव आणि इडीअप्पम् यांच्या अधलामधला. नाव तुम्हीच ठेवा. ):"

 बायकांनी अनेक नवे सुचवली .  मला फक्त  कविता सुचली .....        :-)

बाहेर मुसळधार सरी ,
तुडुंब भरलेले नाले ,
आणि
कांदे, बटाटे , ओव्याची पाने. पालक,
वांगे, घोसाळं ,
सगळे अगदी
हात धुऊन , हट्टाने
"चल न, चल न आम्हाला घेऊन, ,
कढईतल्या "ऑईल वर्ल्डमध्ये "
असे म्हणत बेसनाबाईच्या मागे .

पण उगाच नाही तिला
राष्ट्रपतींचा "शाश्वत स्वयंपाक"
पुरस्कार मिळाला ...

पंचपाळ्यातल्या मसाल्याला
बोलावणे,
त्यांच्या मागेमागे कुतुहलाने
तांदूळ पिठीने डोकावणे ,
आणि पावसात चिंब भिजून
एका कोकण रेल्वेबोगद्यातून बाहेर आल्यासारखे
सोऱ्यातून शेव रुपी बाहेर पडणे .

सर्व कांदे , बटाटे इत्यादी
मोठाले गोल 'आ' वासून थक्क ,
आणि
"बोगद्यात काय होते कोण जाणे..."
असा विचार येताच ,
तिचा इडलीपात्रात
"पोडी स्क्रब " च फेशिअल करण्याचा निर्णय.

वाफेने शुचिर्भूत बेसनाबाई ,
बाहेर येताच ,
"अय्यो, ते कांदे बटाटे लोक खोट बोलले,
आम्हाला वाटलं तुम्ही येणार नाही .. ! "
अस म्हणत
तडतडून सलामी देणारे
राई, जिरे आणि कढीपत्ता पोलीस...

बेसनाबाई स्वतःतच गोल गुरफटून
आपल्याच स्वप्नात रमून गेली .

तिला माहीत न्हवतं ,
की श्री व सौ ऍपल-डाळिंबे
तिला बघायला आले होते ,
आणि बेहद्द खुश होते !

No comments:

Post a Comment