Wednesday, July 6, 2016

भात ताईंची गोष्ट.....

 
माझी मैत्रीण शिल्पा करकरे , संगमेश्वर जवळ कोकणात तुरळ येथे राहते.   पारंपरिक कोकणातील स्वयंपाक , राहणी, विरंगुळ्याचे क्षण , वनश्री , फुले ,फळे  व  स्थानिक पद्धतींची शहरी लोकांना ओळख व्हावी हे ध्येय समोर ठेऊन , Rustic Holidays Homestays ह्या नावाच्या कंपनीचे व्यवस्थापन बघते . 
 
कोकणात सध्या पडणारा मुसळधार पाऊस, आणि भाताच्या पेरण्या, लावण्यांचे दिवस . गावातल्या लोकांसह त्या कामात सौ. शिल्पा व तिचे यजमान ही मग्न असतात . 
 
तिने पोस्ट केलेले  काही फोटो ,  मुंबईच्या रस्त्याच्या खड्डयांबद्दल कुरकुर करणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना बरच काही शिकवून जातात. 

 
आणि एकीकडे कुकरमध्ये शिट्ट्या मारत भात शिजत असताना एक कविता सुचते ...
 


ओलसर, ओळींनी रुजलेले बीज ,
वेळोवेळी त्यांवरून ,
पाटा कडून शिकुन आलेले
कौतुकाने वाहिलेले ओघळ,
आणि जन्माला आलेल्या भात-ताई.

निळ्या आकाशाकडे हट्टाने केली मागणी ,
गडगडून धावून आलेले ढग ,
पावसाची संततधार ,
आणि सर्व भात-ताई मान उंचावून
वार्यात डुलत कोणाची तरी वाट बघतात .

एक वादळी पावसाळी सकाळ ,
आणि वयात आलेल्या उत्सुक भात ताई
घोळक्याघोळक्यांनी टोपलीत विराजतात ;
औट घटकेची सुट्टी ,
आणि मग आपल्या उर्वरित
प्रौढ आयुष्याची सुरवात ,
एका नवीन शेतात ,
पावसाच्या संततधारांमध्ये ,
कुणा एका शिल्पाच्या हाती
वसुंधरेच्या कुशीत शिरतात.

मग एक सोनेरी दिवस ,
डोक्यावर तुरा ,
आणि भात ताई आपल्या सासरी जायला निघतात .

त्यांना काय माहीत,
की कापणी, झोडणी , मळणी ,
ह्या सासरच्या पद्धती !

भातताई धीराच्या .
डोळ्यासमोर साजूक तूप ,
मेतकूट , वरण , दही
सर्व दिसलं ना,
की सगळ्या जया रत्ना भाताला बळ येतं

2 comments:

  1. Khup chan....gavi khupda lavani karyala jayacho amhi pan....he kadi manat nahi ala......lavani maherchi.....kapani sarasarchi.....mast kalpana ahe....

    ReplyDelete