Saturday, July 9, 2016

एक तत्वज्ञानी लाटणे ....

 
माझी मैत्रीण सौ. श्रुती नरगुंदकर , मेलबोर्नला राहते. शैक्षणिक क्षेत्रात , योजना व आराखडे आखून, एखादा विषय उत्तम रीतीने कसा शिकवला जावा , यासाठी  आज्ञावल्या व सूचना बनवणे , या क्षेत्रात तिचे नाव .

ह्या व्यवसायात ती जेवहा गुंग नसते तेव्हा ती   अतिशय सुग्रण, पारंपरिक पदार्थ , व इतर देशांचे पदार्थ करून बघण्यात व त्यांच्याबद्दल लिहिण्यात  व्यस्त असते .  तिचा "Shruti's Blog" ह्या ब्लॉग साइटवर ,  ह्या पदार्थांच्या बनवण्याला ती स्वतःच्या लहानपणीच्या आठवणीची , फोडणी देऊन , अगदी चटकदार लेख लिहिते.
  
सद्ध्या मेलबॉर्न मध्ये थंडीचे दिवस आहेत .  सात अंशात कुडकुडून घरी आल्यावर , वरणफळासारखा दुसरा पोटभरीचा पदार्थ कुठला असणार ?   ह्या विषयावर तिची ब्लॉगपोस्ट वाचली , आणि उगीच मला भगवदगीता आठवली ....




ओट्यावरच्या परातीत
पाण्यात खेळून खेळून दमलेले,
एकत्र येऊन ,
स्वस्थ बसलेले पीठ,
आणि रोजच्या प्रमाणे शिस्तीत
लाटण्याची वाट बघत ,
पिठीकडे डोळे करत,
आपण चांगले, आपले कर्म चांगले ,
असे समजून चुपचाप बसलेली कणीक .

बाहेर कडाक्याची थंडी ,
आणि एका पातेल्यात अचानक
गरम झालेले तेल,
आणि त्यात उडणार्या मोहर्या बघत
"इश्श्य ! काय बाई हा उत्साह " असे म्हणत
वाफेने माखणार्या खिडक्या.

लगबगीने आपल्याच महत्वात गुरफटून
त्यात पडणारे कांदे
कढीपत्ते ,
आणि
"या न डाळकाकू , 

अजिबात थंडी नाही वाजायची"
असा म्हणत स्वतः आत पडणारे
भाजी मंडळाचे आजीव सदस्य;
मग नेहमी प्रमाणे ,
संसदे मध्ये होतो तसा कल्लोळ,
सगळ्यांना उकळी फुटणे,
आणि स्पीकर-डावबाईंने आल्या आल्या
सगळ्यांना व्यवस्थित शिस्त लावणे .

खास चिंच गूळ, खोबरं , मसाला 

यांचे आगमन
आणि
एकीकडे कणकेची लाटी ,
न राहवून पिठीत डुबकी घेऊन येते .
लाटणे आजी बघतात ,
आणि हलक्या हाताने तिला समजावतात ;
"आपण फक्त आपलं काम करत राहायचं;
मोठं व्हायचं ,
आयुष्याचा उत्तम आकार ठेवायचा,
कुठलीही स्वप्न बघत
अथवा बक्षिसाच्या आशेने
कर्म करायचे नाही.
वेळप्रसंगी सुरीशी दोन हात करावे लागले तरी चालेल,
पण जे काही करायचा ते उत्कृष्ट करायचं "


कणकेची पोळी,
आणि पोळीचे तुकडे होतात,
आणि लाटणेआजींची शिकवण आठवून
सर्व उकळणाऱ्या डाळीत पडतात.

अधिवेशनाच्या शेवटी ,
स्पीकरडावबाइंच्या तर्फे
लाटणे आजींचा सत्कार;
आणि मग "नेहमीचे दोन शब्द ":
" पोळपाट आजोबा नेहमी म्हणत ,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
कुठल्याही फळाची अपेक्षा ना ठेवता
आपले काम करत राहावे ,
आणि असे निष्काम कर्म माझ्या पोळ्या करतात !"

म्हणूनच की काय,
ह्या पदार्थाला वरण फळ संबोधून
कुणा एक श्रुतीने त्यांचा सत्कार केला !

1 comment:

  1. वाफेने माखणार्या खिडक्या!! You are a magician Suranga Tai - each time I read your posts, there's a new gem I discover afresh. :)

    ReplyDelete