Wednesday, September 30, 2015

अरे संसार संसार......


कधी कधी , जोन्धळ्याचा,  पिठापासून भाकरी पर्यंतचा प्रवास खूप स्फूर्ती देणारा ठरतो .  आणि बरच काही शिकवून जातो

थोड्याथोड्या प्रमाणात मळलेले पीठ , थापत थापत , कधी पोळपाटावर, कधी हातावर,  मोठी होउन किशोर वयात येणारी भाकरी, तिचे तव्यावरचे आयुष्य ,  निखार्यांवर परीक्षा देउन  हृदयी फुलणे , आणि मग ताज्या लोण्याकडे धाव घेणे …

एका मैत्रिणीने भाकऱ्या बनवून, फेसबुकवर फोटो टाकले ; अगदी पिठापासून पुढे .

त्यांच्याकडे बघून कविता सुचली . ( खालील फ़ोटो विकिमिडिया वरील जाहीर मुक्त सार्वजनिक संग्रहालयातील आहेत.   )
एक हरहुन्नरी हट्टी मुलगी,
कधी पाण्यात खेळ ,कधी दुधात ,
कधी दोघानशी भांड,

आणि मग
कधीतरी लक्ष ठेउन,
परातीने तिला पकडून घरी आणलं ,
आणि समजाउन ,
पाण्याशी लाडीगोडी लाउन,
दोन चार चापट्या मारून
छान गोंजारून शेजारी बसवून ठेवलं .

तव्याने केलेल्या पलिकडून खुणा ,
आणि त्या दिसताच
तिला मिळालेला एक धापाटा,
एकावर एक तिचे गोल् फिरणे
आणि तरी धपाटे चालूच .

शेवटी धाउन आलेला उलथने भाऊ ,
त्याच्या बरोबर तव्याकडे घेतलेली धाव ,
आयुष्यातले बसलेले चटके ,
आणि उगी उगी म्हणत
कोणीतरी तिच्या मुखड्यावर फिरवलेला
पाण्याचा प्रेमळ हात ,
पुन्हा तव्याशी मुकाबला.

युद्धात आणि प्रेमात सगळाच माफ असतं ,
आणि रुसलेला तवा थोड्यावेळ
बाजूला निघून जातो,
आणि सोनेरी निळ्या ज्वाळेवर
तिला आयुष्याचे खरे चटके
आणि डाग,
न्हवे काळे टिक्के लागतात;
नव्या आयुष्याचे स्वप्न बघत ती फुलते ,
आणि मग
तव्याच्या नाकावर टिच्चून
चिमटा बाई बरोबर
कोण एकीच्या ताटात लोण्याला  शोधत जाते।

नव्या नवलाई चे नवे लोणी ;
भाकरीला कळत नाही,
कि तिच्या आयुष्याचा खरा शिल्पकार
आणि सुख दुक्खाचा भागीदार
चक्क तवा आहे .

लोण्यासार्ख्या फेर आणि ब्युटीफुल ला ती भुलते .
तवा काळा असला तरी दिलवाला आहे

ह्या आज कालच्या मुली न …

No comments:

Post a Comment